औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीसाठी उद्या जिल्ह्यात मतदान होणार आहे. यावेळी निवडणुकीत विद्यमान खासदारासह तीन आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दिसायला जरी चौरंगी लढत वाटत असली तरी शेवटच्या टप्प्यात खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यातच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. ते पाचव्यांदा निवडून जाण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील जनता खा. खैरे यांनी गेल्या वीस वर्षांत काय केले याचा हिशेब सर्वच पक्षाचे उमेदवार मागत आहेत. शहरी भागात 50 टक्के मतदार आहेत. पण शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व अन्य नागरी सुविधा पुरविण्यात युतीचे नेते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शहरी भागात विशेषतः सिडको-हडको, हर्सूल, पडेगाव, सातारा परिसरातील मतदारांमध्ये युतीबाबत नाराजी आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत ग्रामीण भागात खा. खैरे यांना कन्नड तालुक्यातून मताधिक्य मिळाले होते. पण यावेळेस मात्र कन्नडचे शिवसेनेकडून निवडून आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि खा. खैरे यांनाच आव्हान देत खैरेंविरुद्ध निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. जाधव यांच्या उमेदवारीमुळे खा. खैरे यांच्या विजयात अडसर निर्माण केला आहे. खा. खैरे यांची मते जाधव घेणार आहेत. त्यामुळे खैरे यांचा विजयरथ रोखला जाऊ शकतो. पण खा. खैरे यांनी विजय मिळविण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर कन्नडमधील मतधिक्य कायम ठेवण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून खा. खैरे यांचे चिरंजीव नगरसेवक ऋषी खैरे स्वतः कन्नडमध्ये तळ ठोकून होते. आ. हर्षवर्धन जाधव यांनी जर जास्त मते घेतली तर खैरे यांचा विजय रथ रोखला जाऊ शकतो. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदान काँग्रेसचे पारंपरिक मतदान आहे. पण यावेळी निवडणूक रिंगणात एमआयएमने उडी घेतल्याने मुस्लिम आणि मागासवर्गीयामधील तरुण पिढी आज त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून येते. पण काँग्रेसला मानणारा तसेच आंबेडकरी चळवळीतील गंगाधर गाडे, प्रा. आ. जोगेंद्र कवाडे, रिपाइंचे राजेंद्र गवई, भीमशक्ती, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आठवले गटातील काही कायकर्ते आ. झांबड यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. त्यामुळे मुस्लिम व मागासवर्गीयांच्या मताची विभागणी होणार आह
जातीय समीकरणे जुळविण्यावर भर
मतदार संघात चौरंगी लढत होत असल्याने चारही उमेदवार जातीय समीकरण जुळविण्यावर भर देत आहेत. मतदार संघात मराठा 5 लाख 75 हजार, ओबीसी 2 लाख 75 हजार, मुस्लिम 3 लाख 75 हजार मागासवर्गीय 2 लाख 75 हजार व अन्य अडीच लाख मतदार आहेत. कोणताही समाज कोणत्याही एका उमेदवाराच्या पाठिशी राहत नाही. तरी सुद्धा सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते राजकीय आकडेमोड करताना दिसत आहेत. सर्व जाती धर्मातील मतदार हे वेगवेगळ्या पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या धर्मावर लोक मतदान करीत नाहीत हे सर्वश्रुत आहे.